सरकार, मानवी बुद्धिमत्ता, मानवी कौशल्ये, मानवी प्रयत्न, मानवी ज्ञान, विशाल व्यवस्था, विशाल स्वप्ने, सत्ता- संपत्ती- स्वार्थ- संघर्ष- स्वामित्व- ; यांच्या मर्यादा आणि निरर्थकता दाखवून मानवी दंभ मोडून काढणारा हा काळ आहे. हा दंभ मोडून मानवाला, जाणिवेच्या चार पायऱ्या वर चढवणे हा नियतीचा उद्देष असू शकतो. (किंबहुना आहे.) यात नियती किती यशस्वी होते हे येणारा काळच दाखवेल.
महाभारतात भीष्मांच्या तोंडी एक प्रसिद्ध वचन आहे. 'न राज्य, ना राजा; दंड नाही, अन दंड करणाराही नाही' मग लोक कसे राहतील? सुव्यवस्था कशी राहील? भीष्म सांगतात - 'सगळी प्रजा धर्मानुसार चालेल आणि परस्परांचे रक्षण करेल.' शासक आणि शासन यांचे असंख्य प्रयोग अनादी काळापासून होत राहिले आहेत. अगदी भारतातही. मोठमोठे सिद्धांत, मोठाली तत्त्वे, मोठाले विचार, मोठाल्या योजना. सगळे होत राहिले अन कोसळत राहिले. आता हा भ्रमनिरास अधिक पक्का करून 'धर्मानुसारी चालण्याकडे' मानव समाजाला घेऊन जाण्याचा नियतीचा हा प्रयत्न आहे. माणूस हे जेवढे नीट समजून घेऊ शकेल तेवढे त्याचे हित होईल.
मानवी बुद्धी, कौशल्ये, ज्ञान, प्रयत्न या गोष्टी पूर्णतः निरर्थक असेही म्हणता येत नाही आणि त्यांना परिपूर्णही म्हणता येत नाही. मात्र, आजवर कमीअधिक प्रमाणात हेच दोन प्रवाह राहिले आहेत. एक 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' आणि दुसरा 'मानवी प्रयत्नांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या वल्गना.' दोन्हीतील तथ्य आणि दोन्हीच्या मर्यादा ध्यानी घेऊन नवीन मार्ग प्रशस्त करणारी जाणीव उत्पन्न करणे हाही नियतीचा आणखीन एक उद्देश. माणूस हे किती समजून घेईल त्यावर त्याचा जीवनमार्ग निश्चित होईल.
बाह्य, ऐहिक जीवनाची स्वाभाविक ओढ हाच मानवी जगण्याचा आशय आहे असे समजून केलेल्या वाटचालीमुळेच; विशाल व्यवस्था, विशाल स्वप्ने, सत्ता, संपत्ती, स्वार्थ, संघर्ष, स्वामित्व हाच मानवी विचार, व्यवहाराचा पाया झाला. अगदी आध्यात्मिक म्हणवल्या जाणाऱ्या समाजातही हीच स्थिती होती आणि आहे. परंतु यांची मर्यादा आणि निरर्थकता गळी उतरवून; माणसाला त्याच्या आंतरिक अवकाशाकडे वळवणे हा नियतीचा आणखीन एक उद्देश आहे. या आंतरिक जाणीवेला बौद्धिक मान्यता देणे पुरेसे नाही तर ती मानवाच्या लौकिक आणि अलौकिक अस्तित्वाचा भाग होणे; म्हणजेच जाणिवेच्या चार पायऱ्या वर चढणे. नियती देत असलेला हा पाठ माणूस शिकला तर त्याचेच भले आहे.
नियती युगास्ताचे आणि युगोदयाचे संकेत देते आहे.
- श्रीपाद कोठे
सोमवार, १९ एप्रिल २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा