प्रश्न हा नाहीच, नसतोच आणि नसावा; की तुम्ही दिवे लावता की विझवता, लावून विझवता की विझवून लावता, मदत करता की करत नाही, मदत आर्थिक करता की वस्तू रुपात, प्रार्थना करता की करत नाही, भाषा कोणती वापरता, शब्द कोणते वापरता, आधी आणि नंतरचे प्राधान्यक्रम कोणते; किंवा अगदी हाही प्रश्न नाहीच, नसतोच, नसावा; की सगळ्यांच्या मनातील द्वेष, असूया, दुष्टता नष्ट झाली की नाही किंवा होते की नाही.
प्रश्न फक्त एवढाच की - माझ्या मनातील द्वेष, असूया, दुष्टता नष्ट झाली की नाही किंवा होते की नाही.
प्रश्न फक्त एवढाच की - सगळ्यांनी परस्परांचा आदर करणे याची सुरुवात माझ्यापासून होते की नाही.
जगाचं जे काही व्हायचं असेल ते कोणाच्याही ताब्यात नसतं. ही हताशा नाही चिरंतन सत्य आहे. वर्तमान स्थितीने ते पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे. मात्र मी असूयामुक्त, द्वेषमुक्त झालो का, झाले का; एवढं स्वतःला विचारण्याएवढं स्वातंत्र्य निसर्गाने/ नियतीने माणसाला ठेवलं आहे. अन मी असूयामुक्त, द्वेषमुक्त व्हायला हवं हे स्वतःला सांगण्याचंही. प्रत्येकाने हे स्वतःला सांगू या. भगव्या, निळ्या, काळ्या, हिरव्या, लाल, पिवळ्या, पांढऱ्या सगळ्या रंगांनी हे सांगू या.
- श्रीपाद कोठे
५ एप्रिल २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा