शनिवार, २ एप्रिल, २०२२

अंधाराशी मैत्री

आताशा मला अंधार आवडू लागला आहे. किती छान असतो ना तो? त्याच्या लेखी सगळ्यांना सारखी वागणूक. कोणी लहान नाही, मोठा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, विद्वान नाही, अज्ञानी नाही, चांगला नाही, वाईट नाही, सुंदर नाही, कुरूप नाही. सगळे सारखे. अंधारात थोडीशी निष्क्रियता असते. उजेडासारखी सक्रियता नसते. पण उजेडातल्यासारखे हेवेदावे, गळेकापूपणा, स्वार्थ हेदेखील नसतात. विचार करून पाहा- नेहमी केवळ अंधारच अंधार राहिला, काय होईल? काहीही होणार नाही. कधी कधी वाटतं, खरा तो अंधारच. त्याला दुसरा कसलाही आधार लागत नाही. स्वत:चं अस्तित्वही त्याला सिद्ध करावं लागत नाही. उजेडासाठी कसं सूर्याला उगवावं लागतं. दिवा लावावा लागतो. काही नाही तर, चकमक तरी घासावी लागते. त्याशिवाय उजेडाचं अस्तित्व नाही. अंधार मात्र स्वयंभू. काही असलं काय नि नसलं काय, अंधार मात्र असतोच. उजेडाला मर्यादाही असतेच. छोटी पणती असेल तर त्यातलं तेल संपेपर्यंतच उजेड. तोही दोन-चार मीटर परिसरातच. तेल संपल्यावर आणि दोन-चार मीटरच्या पलीकडे अंधारच. सूर्य असला तरीही, काही तासांनंतर पुन्हा अंधारच. सगळ्या प्रकारच्या उजेडाचा शेवटही अंधारच. सगळ्या प्रकारचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मातृत्व, चांगलं- वाईट, प्रेम- द्वेष, साऱ्यासाऱ्याचा शेवट शून्य, अंधार. केवढा मानवाचा इतिहास? पण सगळा अंधारच. कोणी एक गोष्ट सिद्ध करतो, कोणी बरोब्बर ती खोडून काढतो. काय सत्य? भविष्याबद्दल तर सारेच अंधारात. आपण काही तरी करायचं. यश आलं तर म्हणायचं- भविष्य उज्वल असतं. अपयश आलं तर- अंधारच. अन यशाचा तरी शेवट अंधारच ना? आणि गंमत माहिताय? अंधारात सारं संपून जातं, मिटून जातं, शून्य होतं, पण आपलं अस्तित्व मात्र कायम असतं. आपलं `मी'पण संपत नाही. अंधार आणि मी यातलं हे साम्य आहे. त्यांचं अस्तित्व स्वयंभू असतं आणि अविनाशीही. म्हणूनच वाटतं, खरा मित्र अंधारच.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, ३ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा