डावे पक्ष म्हणजे डावा विचार म्हणजे मार्क्सचा विचार, एवढी सर्वसाधारण माहिती असते. याहून अधिक माहिती असेल तर कार्ल मार्क्सने `das kapital' ग्रंथ लिहिला हे सांगितले जाते. पण १८६७ मध्ये हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिण्याच्या दहा वर्षे आधी भारत, भारतीय परिस्थिती, १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्ध याविषयी याच कार्ल मार्क्सने New-York Daily Tribune या वृत्तपत्रात, लंडनचा प्रतिनिधी या नात्याने अनेक लेख लिहिले; हे मात्र फारसे माहिती नसते. या लेखांपैकी जुलै १८५७ ते ऑक्टोबर १८५८ या काळातील ३१ लेख विशेष उल्लेखनीय आहेत. एक गंमतीचा भाग म्हणजे- स्वा. सावरकर यांनी १८५७ चा उठाव हे शिपायांचे बंड नसून तो राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा होता, असे म्हणण्यापूर्वी ५२ वर्षे आधीच मार्क्सने १८५७ च्या उठावाचे वर्णन `भारताचा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा' असे केले होते. एवढेच नाही तर हा राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा नसून, साधे शिपायांचे बंड आहे असे म्हणणाऱ्यांची बाजू खोडून काढण्यासाठीही मार्क्सने लेखणी झिजवली होती. त्यांच्या या तर्काचा एक अर्थ सरळ स्पष्ट आहे की, भारत एक राष्ट्र होते अन आहे हे मार्क्सला मान्य होते. भारत एक राष्ट्र नव्हतेच, ब्रिटीश व्यवस्था येथे लागू झाल्यानंतर भारत एक राष्ट्र होण्याला सुरुवात झाली; असे प्रतिपादन करणारे नेहरू व नेहरूवादी आणि कम्युनिस्ट यांच्यापेक्षा मार्क्सचे भारताविषयीचे आकलन निराळे होते. आजही कन्हैय्याकुमार पासून सागरिका घोष पर्यंत भारत हा तुकड्या तुकड्यांचा देश असल्याचे, भारतात अनेक राष्ट्रे असल्याचे जे अकलेचे तारे तोडले जातात ते कार्ल मार्क्सच्या आकलनाशी विसंगत आहे. याच लेखांमध्ये एका ठिकाणी भारताविषयी मार्क्स म्हणतात- भारताने आजवरच्या आक्रमकांचे `हिंदूकरण करून त्यांना आत्मसात करून टाकले आहे.' या छोट्याशा वाक्यात त्यांनी भारताची प्रकृती नि:संदिग्धपणे प्रतिपादित केली आहे. इंग्रजांचेही असेच होईल हेच त्यांना त्यातून सूचित करायचे असावे. त्यावेळी त्यांनी आपले आर्थिक विचार प्रतिपादन केलेले नव्हते. त्यामुळे त्यावर आधारित मार्क्सवाद, त्याला अनुसरून कम्युनिस्ट पार्टी इत्यादींची कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र आज कार्ल मार्क्स असते तर, `भारत कम्युनिझमचे हिंदूकरण करून त्याला आत्मसात करून टाकेल,' असा अभिप्राय त्यांनी निश्चित व्यक्त केला असता. या ३१ लेखांमधील काही लेख कार्ल मार्क्सचे सहकारी एंजल्स यांचेही आहेत.
- श्रीपाद कोठे
९ एप्रिल २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा