राजकारणाच्या संदर्भात एक गाणं मनात येतं. 'हम से आया न गया, तुम से बुलाया न गया'. इंग्रजांकडून आपल्या लोकांनी राज्य हाती घेतल्यानंतर सत्ताकारणाचा जो प्रवाह तयार झाला त्याला हे गाणं लागू होतं. सत्ताधारी असोत की विरोधक; आपापले कथित सन्मान जपणे आणि दोन निवडणुकींच्या मधल्या काळातील प्रत्येक गोष्टीचा पुढील निवडणुकीच्या अंगाने विचार करणे हाच राजकारणाचा युगधर्म झालेला आहे. नाही म्हणायला काही अपवाद नक्कीच सापडतात. मात्र अपवादच. नियम नाही. अडचणी असोत, समस्या असोत, आपत्ती असोत; सत्ताधाऱ्यांनी आपण सर्वशक्तिमान आहोत या तोऱ्यात राहायचं आणि विरोधकांनी सत्ताधारी कसे निरर्थक आहेत याचे पाढे वाचायचे. सत्ता मिळाली म्हणजे कोणी (कोणतीही व्यक्ती, कोणताही पक्ष, कोणतीही आघाडी) सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, अचूक, सर्वक्षम होत नाही. मात्र सत्ता मिळालेले तसं समजतात आणि सत्ता न मिळालेले तसंच समजून वाभाडे काढत राहतात. त्यात जनता भरडली जाते. पण लोकशाहीतील राजा असलेली जनता इतकी सुमार आहे की, ही किंवा ती बाजू घेणे यापलीकडे तिची समज आणि झेप जात नाही. सत्ता मिळाली त्याला मिळाली, सत्ता मिळण्यात अनेक घटकांचा प्रभाव असतो; पण एकदा सत्तेने माळ घातल्यावर ती फक्त आणि फक्त जनतेसाठी राबवली जायला हवी. अन ती तशी राबवली जाईल याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही आहे; हे ठणकावून सांगण्याची क्षमता, धैर्य आणि शक्ती; राजा म्हणवणाऱ्या जनतेत नाही. तुमची सत्ताकांक्षा तुमच्याजवळ ठेवा, पण अगदी दैनंदिन कामकाजापासून तर अडीअडचणी, संकटे, आपत्ती, समस्या या सगळ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सार्थक संवादच असायला हवा. कोणी कोणाकडे जायचे, कोणी पुढाकार घ्यायचा, कोणी कमीपणा घ्यायचा; तुमचं तुम्ही पाहा. We only want results. हे सांगण्याची धमक असायला हवी. आजचा समाज ती धमक नसलेली नेभळट झुंड झालेला आहे. कोण कोणावर कुरघोडी करतो यातच समाजाला स्वारस्य असते. समस्या सुटणे वगैरे त्याच्यासाठी दुय्यम ठरतात.
सध्याच्या कोरोना लसींच्या संदर्भात सुरू असलेल्या वादावादीच्या संदर्भात हा विचार मनात आला.
- श्रीपाद कोठे
८ एप्रिल २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा