बुधवार, ६ एप्रिल, २०२२

व्याजदर

आपण विचार दूर ठेवून `वाटण्या'त (perception) कसे वाहवतो याचा आजचा ताजा संदर्भ. रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर केले. उद्योग विश्वाचे लक्ष व्याजदर कधी कमी होतील यावर लागले आहे. व्याजदर कमी झाले की वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यामुळे विक्री वाढेल आणि विकासाला चालना मिळेल, असे त्यांचे गणित आहे. कोणीतरी आम्हाला तसे सांगितले आणि विचार नावाच्या गोष्टीशी संबंध नसल्याने आम्ही ते स्वीकारले. त्यामुळे आज रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करते का याकडे साऱ्यांचे लक्ष होते. रिझर्व्ह बँकेने तसे काही केले नाही. मग झालेल्या बँक प्रमुखांच्या आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नरांच्या पत्रपरिषदेत यावरच चर्चा. चहाच्या टपरीवरील स्वनामधन्य विद्वानांपासून तर कॉर्पोरेट जगातील लोकांपर्यंत किंवा अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांपर्यंत सगळे या एकाच भाषेत बोलतील. परंतु भारतापेक्षा किती तरी कमी व्याजदर असलेले किती तरी देश आहेत. त्यात अमेरिका आणि युरोपीय देशही आहेत. या देशांमध्ये विकास का ठप्प झाला आहे? हा प्रश्न कोणालाही पडत नाही. व्याजदर कमी होणे हाच जर मूळ वा एकमेव प्रश्न असता तर, अन्य देशांचे काय? पण असे प्रश्न पडले तर तुम्ही विद्वान, अभ्यासू किंवा विचारवंत वगैरे ठरत नाही ना...!!!

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा