रविवार, ३ एप्रिल, २०२२

संस्कृतीरक्षक आणि संस्कृतीभक्षक

लोणावळा येथील एका बंगल्यात ४७ मद्यधुंद तरुण-तरुणींना मध्यरात्री धांगडधिंगा करताना पोलिसांनी अटक केली. या बातमीत आणि अशा घटनात आता नावीन्य राहिलेले नाही. अशा घटनांमध्ये सहभागी तरुणांच्या पालकांनी स्वत: त्याला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतल्याची उदाहरणेही आहेतच. स्वातंत्र्य कसे, किती, कशाचे वगैरे प्रश्न भारतातच नव्हे तर जगभरातच चर्चिले जात आहेत. त्यामुळेच चारच दिवसांपूर्वी जपानमधील पालकांनी रात्री नऊ वाजता आपल्या पाल्यांचे मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक व्यक्तीची स्वतंत्रता आणि सहजीवन किंवा समाजजीवन यांचा मेळ घालण्याचा हा प्रश्न आहे. पण हे नीट न समजून घेता आपल्याकडील विद्वान म्हणवून घेणारे लगेच संस्कृतीरक्षक संस्कृतीरक्षक म्हणून किंचाळायला लागतात. त्यांचा हा संस्कृतीद्वेष आता इतका विकृत झालेला आहे की, लोणावळा येथे काल झालेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांवर टीकेची झोड उठवायला त्यांनी सुरुवात केली आहे. समाज आणि संस्कृतीचे कट्टर वैरी आणि उन्मत्ततेचे कैवारी अशा या लोकांना आता एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की, `संस्कृतीभक्षकांना जर संस्कृती मोडीत काढण्याचे स्वातंत्र्य आहे तर संस्कृतीरक्षकांना त्यासाठी कृती करण्याचे स्वातंत्र्य नाही का?'

- श्रीपाद कोठे

४ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा