बुधवार, ६ एप्रिल, २०२२

मोकळा वेळ

आज एक चार ओळींची बातमी वाचण्यात आली. मनात आलेला पहिला विचार म्हणजे, ही बातमी एखाद्या तरी वृत्तपत्राची पहिली ठळक बातमी का होऊ नये. अर्थात तसे होणे नाही हेही खरेच. बातमी होती- स्पेनमध्ये कामाच्या अवधीत दोन तास कपात करणार असल्याची. हा निर्णय घेण्यासाठी त्या देशाने तीन वर्षं विचार केला. मनुष्याला जीवन जगता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या कोलाहलात कोणी फारसे लक्ष देणार नाही असा हा विषय आहे. वास्तविक हा विषय नवीन नाही. एवढेच नाही तर, महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय या द्रष्ट्या महापुरुषांनी आर्थिक विचार मांडताना माणसाला आवश्यक असलेल्या मोकळ्या वेळेचीही चर्चा केली आहे. आज मात्र हा विषय दुर्लक्ष करण्याचा, चेष्टेचा, हीन भावनेने पाहण्याचा समजला जातो. `मरायलाही फुरसत नाही', `त्याला बिलकुल वेळ नसतो', `आजकाल सगळे खूप व्यस्त झाले आहेत' अशी वाक्ये खूप अभिमानाने बोलली जातात. लहान, संथ शहर म्हणजे `पेन्शनरांचे गाव' अशी हेटाळणी केली जाते. सतत व्यस्त वा गुंतलेले असणे हा फार मोठा पुरुषार्थ समजला जातो. अन तोच काळप्रवाह असल्याने त्यापेक्षा वेगळे बोलायला, वागायला कोणी धजावत नाही. खोट्या गोष्टी मोठ्या करायच्या अन त्यातच रममाण व्हायचे हा तर आजचा खाक्याच आहे. सुदैवाने स्पेनसारख्या देशाला ही बाब जाणवली आणि त्याने वर्तमान धारणांना छेद दिला. खरे तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, वैचारिक, भावनिक, बाह्य व आंतरिक, आध्यात्मिक; अशा सर्व प्रकारच्या विकासासाठी काही मोकळा वेळ आवश्यक असतो. तोही नियमित आणि सुविचारीत हवा. आजकालच्या `पाच दिवसांचा आठवडा' किंवा भविष्यात येऊ घातलेला `चार दिवसांचा आठवडा' आणि `enjoy the weekend' अशा स्वरूपाचा तो नको. माणूस हा पैसे कमावण्याचे यंत्र नाही, तसेच काम करण्याचेही यंत्र नाही. किंवा चार घटका मौजमजा, दंगामस्ती, आरडाओरडा करणे हाही जीवनाचा आशय नाही. ज्याला जीवन म्हणून म्हटले जाते त्याच्या असंख्य पैलूंचे उलगडत जाणे आणि या उलगडण्यातून येत जाणारे पूर्णत्व; यासाठी विशिष्ट प्रमाणात कामही हवे अन विशिष्ट प्रमाणात मोकळा वेळही हवा. माणसाची मानसिकता, आजच्या व्यवस्था, शहर नियोजन, आर्थिक- सामाजिक- राजकीय- रचना, जीवनविषयक दृष्टीकोन, संकल्पशक्ती; अशा अनेक गोष्टी त्यासाठी हव्यात.

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा