बुधवार, ६ एप्रिल, २०२२

आरोग्यासाठी

आज जागतिक आरोग्य दिवस आहे. १९४८ च्या ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेची (who) स्थापना झाली होती. यावर्षीचा आरोग्य दिन जागतिक अनारोग्याच्या सावटाखाली आहे. वैद्यक आणि आरोग्य विषयातील लोक अपार कष्ट घेत आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही आहे. शिवाय त्यांची क्षमता, आराम, थकवा याही बाबी आहेत. या क्षेत्रात माणसांची गरज पडू शकते. अजून तरी तशी मागणी वा आवाहन झालेले नाही. पण शक्यता लक्षात घेऊन, या कामांसाठी मी तयार असल्याचे मी जाहीर करतो. मी वैद्यक क्षेत्रातला माणूस नाही. पण वैद्यकीय तज्ञांच्या सोबत आणखीनही बरीच माणसे लागतात. थोड्याशा सांगण्याने लहान लहान कामे करता येतात. त्यात सहभाग देता येईल. त्यासाठी मी तयार आहे. आपणही विचार करून पहावा.


शिवाय - काही गोष्टी किमान मनाने स्वीकारण्याची आणि त्या दृढपणे धरून ठेवण्याचीही गरज आहे. जसे -

- कमी झालेले प्रदूषण असेच कायम राखणे.

- झोप, आहार यांच्या आरोग्यदायी सवयी लावून घेणे.

- अधिक निसर्गमित्र होणे.

- साधे जीवन.

- वस्तूंचा पूर्ण वापर.

- वस्तूंचा, नावीन्याचा, अति मानवी कृतींचा सोस टाळणे.

- वाहने, तंत्रज्ञान, रोजच्या वापरातील सुखसाधनांचा वापर मर्यादित करणे.

- मानवी बौद्धिक कौशल्यातून तयार झालेल्या, होणाऱ्या, केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचा मनावरील पगडा कमी करणे.

- कृत्रिम जीवनाऐवजी खऱ्या जीवनाला प्राधान्य.

- विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास, आर्थिक विकास, शैक्षणिक विकास, औद्योगिक विकास इत्यादी गोष्टींचा जीवनाच्या विकासाच्या संदर्भात विचार करणे.

- जाहिराती, राजकारणी, सुखलोलुप व्यक्ती- संस्था- विचार- तत्वज्ञान- समोर ठेवीत असलेली किंवा दाखवीत असलेली स्वप्ने बाजूला सारणे.

- मोकळा वेळ, शांत जीवन, कमी वेग या गोष्टी अजिबातच वाईट नाहीत, उलट योग्य आहेत; हे रुजवणे.

यासारख्या गोष्टी एकदम प्रत्यक्षात येणं कठीण असेल हे खरं. पण मनाने स्वीकारून त्यांना घट्ट धरून राहायचं ठरवलं की, हळूहळू त्याचे उपाय आणि मार्ग विकसित होतील. या गोष्टी जर आवश्यक असतील तर त्या केल्याच पाहिजेत ही मानसिकता तयार होत जाईल. हे सगळे अशक्य आहे म्हटले की त्याची ढाल करून पुन्हा अनारोग्याकडे वाटचाल होईल. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी लक्षणे समोर ठेवली आहेत त्यात आध्यात्मिक घटकही आहे. आजच्या अनारोग्याच्या सावटाखालील जागतिक आरोग्य दिनी किमान एवढे करता येण्यासारखे आहे.

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा