गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

बाई बोलल्याच

बाई बोलल्याच. स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन नाचणाऱ्यांना आता उत येईल. आम्ही मराठी सिनेमे पाहायचे की नाही, पाहायचे तर केव्हा पाहायचे ते आम्ही ठरवू वगैरे खूप गदारोळ होईल. पण अशी जबरदस्ती का करावी लागते? उंहुं, असे प्रश्न नाही विचारायचे. स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य. या दीड शहाण्यांना हे सांगितले पाहिजे की, जेव्हा नाठाळपणा वाढतो तेव्हा वेसण घालावीच लागते. या मुद्याला घेऊन पुन्हा एकदा संस्कृतीचा वगैरे उद्धार सुरु होईल. पण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हवे की, यांच्या वैचारिक बापजाद्यांनी स्वातंत्र्याचं जे स्वप्नही पाहिलं नसेल ते व्यास महर्षींनी पाहिलं होतं. `जेथे राज्य असणार नाही, राजाही असणार नाही... जेथे दंड देणारा कोणी नसेल, ज्याला दंड द्यावा असा कोणी नसेल... प्रजा धर्माच्या आधारे व्यवहार करून परस्परांचे रक्षण करेल' हे पूर्ण स्वतंत्र आदर्श समाजाचं त्यांचंही स्वप्न होतं. कदाचित तुमच्यापेक्षा कितीतरी भव्य, दिव्य, उदात्त. पण व्यवहारात ते येईपर्यंत राज्य, राजा आणि दंडशक्ती आवश्यकच नव्हे अपरिहार्य आहे, याची जाणीवही त्यांनी दिली. स्वातंत्र्याच्या उफराट्या, वांझ गप्पा झोडण्यापूर्वी जमिनीवर राहायला शिका. मराठीच्या नावे गळे काढण्याआधी आणि संस्कृतीचा उद्धार करण्यापूर्वी स्वत:ची डोकी तपासून घ्या. तुमचं स्वत:चं जगणं अशा दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचं हरण करणाऱ्यांमुळे सुरळीत चालत असतं हे लक्षात असू द्या.

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा