शनिवार, २३ एप्रिल, २०२२

पाप आणि गुन्हा


पाप आणि गुन्हा या दोन्ही कल्पनात व्यक्तीची चूक ही मूळ गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तसंच जगत, वागत असते. परिस्थितीच्या दबावामुळे त्यात बदल होतो वा करावा लागतो. परिस्थितीचा दबाव कधी जोरजबरदस्तीचा मामला असतो, तर कधी राजीखुशीचा. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावेही दिली जातात. जोरजबरदस्तीचा भाग असेल तर त्याला; तडजोड, किंमत चुकवणे, अपरिहार्यता यासारखे रंग लाभतात. राजीखुशीचा मामला असेल तर त्याला प्रेम, त्याग, सेवा असे रंग लाभतात. पण मुळात परिस्थितीचा हा दबाव आपण स्वीकारतोच का? त्याचे साधे, सरळ उत्तर आहे जगण्यासाठी. आजुबाजूला माणसे, निसर्ग, वातावरण काहीही नाही आणि जगतोय ही कल्पनाही करणे शक्य नाही आणि तसे जगणेही शक्य नाही. असे जगताना स्वाभाविकच काही मर्यादा येतात आणि त्यातून सर्वसाधारण शहाणपणातून काही नियमांचा जन्म होतो. सुरळीत (सुखी, समाधानी किंवा सार्थक वगैरे नाही) जगण्यासाठी हे नियम पाळण्याला सगळे मान्य करतात. हे नियम न पाळणे म्हणजे चूक. चूक या गोष्टीला त्याहून फार अर्थ नाही. तसे पाहिले तर चूक नावाची काही गोष्टच नाही. नियम न पाळणे हाच त्याचा अर्थ. आणि चूक केली की दिली जाते ती सजा. सजा देण्यासाठी चूक सिद्ध करावी लागते. त्यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात गुन्हा आणि धार्मिक नीतीच्या भाषेत म्हणतात पाप. परंतु या दोनमध्ये बाकी काही फरक नसला तरीही एक सूक्ष्म भेद आहे आणि तो सूक्ष्म असला तरीही तसा मोठा आणि महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या चुकीकडे गुन्हा म्हणून पाहिले जाते तेव्हा त्याचा निर्णय चूक करणारी व्यक्ती सोडून बाकीचे करतात. काय शिक्षा द्यायची तेदेखील अन्य लोक ठरवतात. अन शिक्षा भोगून संपली की त्या चुकीतून सुटका होते. मात्र, एखाद्या चुकीकडे पाप म्हणून पाहिले की, त्याचा अंतिम निर्णय चूक करणाऱ्याच्या मनातून व्हावा लागतो. त्यासाठी प्रायश्चित्त त्याच्याच मनाने घ्यावे लागते. प्रायश्चित्त घेऊनही सुटका नसते, तर उपरती होऊन पुन्हा चूक होऊ नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे पाप कल्पनेत संबंधिताच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असते. त्यातून व्यक्तीच्या आंतरिक विकासाच्या शक्यता विस्तारतात. गुन्हा म्हटल्यावर सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असलेच पाहिजे असे नाही. त्यामुळेच आंतरिक विकासाच्या शक्यताही धूसर होतात. सामुहिक जीवनातील चूक आणि त्याला सजा एवढेच त्याचे स्वरूप असते. आज पाप ही कल्पना सोडून दिल्यासारखी दिसते. त्यामुळे penance, प्रायश्चित्त (चित्त महत्वाचे), तपस्या या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत. म्हणूनच आंतरिक विकासाचा अभाव जाणवतो. या आंतरिक विकासासाठी जगात जे काही प्रयत्न आजवर झालेत त्यातील `पाप-पुण्य' संकल्पना हाही एक महत्वाचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य यांच्यासाठी `गुन्हा' ही बाब योग्य असली तरीही, त्याला `पाप-पुण्य' याचीही जोड देता येईल का? या दोन्ही कल्पनांचा समन्वय अधिक पूर्णतेकडे नेईल का? विचार व्हायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २४ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा