किशोरीताई गेल्या पण अजूनही रेंगाळतायत. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट. त्यावेळी टेप रेकॉर्डर होते. गाणी, कथाकथन, भजने, शास्त्रीय संगीत यांच्या ध्वनिफिती मिळत. तशाच कोऱ्या ध्वनिफिती असत. त्यावर आपल्याला हवे ते रेकॉर्ड करायचे. गाण्यांच्या ध्वनिफितीसोबत दोन-तीन कोऱ्या ध्वनिफितीही घरात असतच. त्या कोऱ्या ध्वनिफितीवर काही रेकॉर्ड केले असेल तरीही दुसरे काही रेकॉर्ड करता येत असे. आधीचे मिटून जात असे. त्यातही टी-सिरीजच्या स्वस्त ध्वनिफिती असत आणि फिलिप्स वगैरेसारख्या दर्जेदार ध्वनिफिती असत. टेपरेकॉर्डर असला तरीही प्रस्थ आकाशवाणीचेच होते. आकाशवाणीवर दर शनिवारी शास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम राहत असे. साधारण दीड तासाचा तो कार्यक्रम असायचा. आता live मैफिली सुद्धा एवढा वेळ नसतात बहुधा. तो कार्यक्रम हमखास लागत असे घरी. वडिलांना त्याची आवड. एका शनिवारी कार्यक्रमाची उद्घोषणा झाली- `आज के कार्यक्रम कि प्रस्तुती करेगी भारतीय शास्त्रीय संगीत कि सुप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर.' अन वडिलांची धावपळ सुरु झाली. त्यांचं गाणं टेप करण्यासाठी. किशोरी आमोणकर कोण अन त्यांचं गाणं काय हे काही तेव्हा समजत नव्हतं. कानाला काहीतरी गोड वाटत असे एवढंच. आमोणकरांचं गाणं टेप करायचं म्हणजे टी-सिरीजची ध्वनिफीत नको. चांगली हवी. मग फिलिप्सची एक कोरी ध्वनिफीत होती तिच्यावर टेपिंग सुरु झालं. प्रथम हंसध्वनी- `गणपती विघनहरा... गजानन...' आणि नंतर रागेश्री. पूर्ण दीड तासाचं टेपिंग. ध्वनिफीत एका बाजूने संपली की काढून दुसऱ्या बाजूने लावायची. त्यात एखादा मिनिट गेला असेल तेवढेच. अन टेपिंग सुरु असल्याने दीड तास घरातील सगळे आवाज चिडीचूप झालेले. मग शेकडो ध्वनिफितीत लक्षात यावे म्हणून त्यात हाताने लिहिलेला कागद. त्यावर लिहिलेले- किशोरी आमोणकर- हंसध्वनी/ रागेश्री. अनेक वर्षे, म्हणजे साधारण विसेक वर्षे तरी ती ध्वनिफीत होती. शेवटी शेवटी जुनी झाल्याने ती व्यवस्थित फिरत नसे. तेव्हा त्याच्या काटेरी इवल्याशा चाकात पेन वा चमच्याची दांडी घालून ती फिरवायची, मोकळी करायची अन मग लावून ऐकायची. तिथून सुरु झालेला प्रवास मग `सहेला रे...' करत, `अवघा रंग एक झाला' पर्यंत येऊन पोहोचला. सहेला ला आळवत, येण्याची, सोबत गाण्याची आणि एकमेकांना सात सुरांचे भेद ऐकवीत स्वरांची रंगपंचमी साजरी करण्याची गळ घालणारा हा स्वर, अखेरीस सारा पसारा आवरून, सारे स्वररंग सावरून घेत- `अवघा रंग एक झाला'च्या अवस्थेला पोहोचला. अन अखेरीस स्वत:च पांडुरंगात मिसळून गेला. कृतार्थ, परिपूर्ण जीवन. आपलं जगणं समृद्ध केलं. त्यासाठीची कृतज्ञता. क्षणभराची.
- श्रीपाद कोठे
५ एप्रिल २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा