बुधवार, २७ एप्रिल, २०२२

'मी'चे 'आनंदस्वरूप'

आज आद्य शंकराचार्यांची जयंती. त्यांचे निर्वाणषटकम प्रसिद्ध आहे. केवळ सहा पदात तत्वज्ञानाचं समग्र सार आचार्यांनी सांगितलं आहे. या सहा पदांचा शेवट एकाच वाक्याने होतो. ते आहे - चिदानंद रूप: शिवोहं शिवोहं !! प्रत्येकी चार ओळींची ही सहा पदे. प्रत्येकातील तीन ओळी 'मी' कोण नाही हे सांगतात. अन अखेरची ओळ 'मी' कोण आहे हे सांगते. वास्तविक भारताचा तत्वविचार टोकाचा व्यक्तिवादी आहे. भारताचे सामाजिक चिंतन देखील त्याच्या आगळ्या व्यक्तिवादावर आधारलेले आहे. (तो एक स्वतंत्र विषय आहे.) आचार्य या स्तोत्रात भारताचा हा व्यक्तीविचार मांडतात. भारतेतर जगात 'मी'शी स्वाभाविक वा कृत्रिम पद्धतीने जोडलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये 'मी'शोधण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर 'माझे' म्हणून जे जे काही असते त्यावर 'मी'चे आरोपण केले जाते. भारतीय व्यक्तीविचार मात्र स्वाभाविक वा कृत्रिम पद्धतीने जोडलेल्या गोष्टी बाजूला सारून, 'माझे' बाजूला सारून सोलीव, निखळ, absolute, केवळ 'मी' आपल्यापुढे मांडतो. 'माझे' ही संज्ञा लावता येईल ते सारे 'मी' समोरून सरकणारे एक चलचित्र आहे. चलचित्र कोणतेही असू शकते. पडदा तोच असतो. 'मी' तोच असतो. चलचित्रासोबत पडदा बदलत नाही. 'माझे' बदलते, 'मी' बदलत नाही. व्यक्तीविचारांच्या या मूलभूत भिन्नतेमुळे एकूण जीवनातच खूप फरक पडतो. 'मी' गमावणे दोन्ही विचारांना मान्य नाही. ते होऊच शकत नाही. परंतु 'माझे'मध्ये 'मी' शोधल्याने भारतेतर जीवनात वस्तू, व्यक्ती, विचार, शरीर, भावना, इतिहास, निर्मिती; अशा असंख्य गोष्टींना अनन्यसाधारण स्थान मिळाले. या साऱ्यांचा संग्रह करणे, तो संग्रह टिकवणे, घट्ट धरून ठेवणे; आवश्यक होऊन बसले. त्यासाठीचा अट्टाहास हे जीवनाचं प्रमुख लक्षण आणि दिशादर्शक तत्व झालं. कारण 'मी' हा या सगळ्या गोष्टींच्या संग्रहाचं नाव समजलं गेलं. याउलट भारतीय विचारांनी 'मी' आणि 'माझे' यांच्यात फरक केला. अन 'माझे' बाजूला करून शुद्ध 'मी' वर लक्ष केंद्रित केले. आचार्यांनी निर्वाणषटकात हेच सांगितले आहे. एक आणखीन महत्वाची गोष्ट त्यांनी यात सांगितली आहे. ती म्हणजे - या शुद्ध 'मी'चे स्वरूप. 'माझे' बाजूला सारून 'मी' मिळेल असे मोघम सांगून आचार्यांनी सोडून दिलेले नाही. त्यांनी हाती येणाऱ्या शुद्ध, सोलीव 'मी'चे स्वरूप सांगितले आहे. ते आहे - चिदानंद रूप. हा आनंदमय मी समजून घेणेही गरजेचे आहे. आनंद म्हटला की आपल्या मनात विशिष्ट चित्र उभं राहतं. हास्याचा गडगडाट, माणसांचा मेळा, खाणे पिणे वस्त्र प्रावरणे, गप्पागोष्टी, कल्लोळ, वेगवान कृती, नृत्य; अशा काही कल्पना मनात आपोआप तयार होतात. पण त्याला आनंद म्हणता येईल का? संन्यासी परंपरेत आपण गंभीरानंद असं नावही ऐकतो. गंभीर असून आनंद कसा असू शकेल? मुळात आनंद या गोष्टीचं नीट आणि योग्य चित्र तयार करण्याचा प्रयत्न पुरेशा प्रमाणात व्हायला हवा. आनंदाचं प्रमुख लक्षण म्हणजे 'रमणे'. माणूस ज्यात रमतो तिथे त्याला आनंद मिळतो असं म्हणता येईल. हे रमणं बहिर्मुखी असू शकतं किंवा अंतर्मुखी सुद्धा. आनंदाचं दुसरं लक्षण म्हणजे त्याने कोणाला त्रास होऊ शकत नाही. कोणाला त्रास होत असेल तर त्याला आनंद म्हणता येणार नाही. आनंदाचं तिसरं लक्षण म्हणजे, तो स्वयंभू असतो. त्याला अन्य कशाचा आधार, अन्य कशाची मदत लागत नाही. ही तीनही लक्षणे असणारा आनंद हा खरा आनंद. 'मी'चं आनंदस्वरूप हे असं आहे. आजच्या घडीला तर हे फारच महत्वाचे आहे. कोरोनाने 'माझं' काढून घेतलं आहे. अन 'माझं'मध्ये 'मी' आणि 'आनंद' शोधण्याच्या प्रयत्नांनी निराशा आणि वैफल्य पदरात घातलं आहे. 'मी' आणि 'मी'चं 'आनंदस्वरूप' यांचं आचार्यांनी केलेलं विवेचन म्हणूनच अधिक कालोचित ठरतं.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, २८ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा