रविवार, १० एप्रिल, २०२२

कोणीही कोणाचं नसतं !!

तिशीच्या पुढील प्रत्येक जण कधी ना कधी, कुठे ना कुठे; एक वाक्य म्हणतोच- `कोणीही कोणाचं नसतं.’ अगदी सामान्य माणसापासून जगावर अमिट छाप सोडून जाणारे प्रज्ञावंत, प्रतिभावंत सुद्धा हे बोलून, सांगून जातात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज असोत, खलील जिब्रान असो की आदि शंकराचार्य असोत; हे सत्य सांगून गेले आहेत. एकच वाक्य तिघेही सांगतात पण किती फरक असतो त्यात?

कुसुमाग्रजांचे `नटसम्राट’ आप्पा बेलवलकर जेव्हा म्हणतात, `पाठीवर आभाळ घेऊन फिरणाऱ्या त्या हत्तींना विचारा, तेही सांगतील- कोणीही कोणाचं नसतं.’ तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं तरी असायला हवं. कोणी कोणाचं नसतं, या कटू व्यावहारिक अनुभवावरील ती स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया असते. त्यात थोडासा रोष, तक्रार, वैताग असतो. `कोणी कोणाचं नसतं’ हे वास्तव; वास्तव राहू नये, अशी इच्छा त्यातून व्यक्त होते.

खलील जिब्रानचा `प्रोफेट’ गावातील लोकांना जेव्हा सांगतो की, `तुमची मुले तुमची नाहीत. ती तुमच्यातून आली आहेत.’ त्यावेळी तो `कोणीही कोणाचं नाही’ या सत्याचं तात्त्विक विवेचन करीत असतो. जीवनाचा अनुभव, निरीक्षण, चिंतन, सार्वत्रिकीकरण या आधारावर तो जीवनाचं तत्वज्ञान मांडतो.

आदि शंकराचार्य आपल्या निर्वाणषटकात जेव्हा सगळ्या गोष्टींचं, `हे मी नाही, ते मी नाही’ असं वर्णन करतात तेव्हा तेही `कोणीही कोणाचं नाही’ असंच सांगत असतात. मी- बुद्धी नाही, अहंकार नाही, आई नाही, वडील नाही, गुरु नाही, मोक्ष नाही, बंध नाही, भूक नाही, तहान नाही; असं सांगणारे शंकराचार्य कोणी कोणाचं असण्याची गरजच मोडीत काढतात. मात्र एक फार मोठा फरक ते करतात, अमुक नाही, तमुक नाही असं सांगत असतानाच मग मी कोण आहे हेही सांगतात आणि म्हणतात- `चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम’. मी चिदानंदरूप शिव आहे. म्हणूनच शंकराचार्य जेव्हा `कोणीही कोणाचं नाही’ असं सांगतात तेव्हा ते त्रागा किंवा तत्वज्ञान या स्वरुपात न राहता, `कोणी आणि कोण’ यांच्या सत्यदर्शनाची अनुभूती या स्वरुपात आपल्यापर्यंत येतं.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, ११ एप्रिल २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा