मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

अस्मिता मोडण्याऐवजी जोपासाव्या

अस्मिता. अतिशय महत्वाची, कोड्यात टाकणारी अन गुंतागुंतीची गोष्ट. ही अस्मिता नसेल तर सारेच शून्य. काहीच उरणार नाही. autism ने पिडीत लोक नाही का? ते असतात तरीही कशाला काही अर्थ नाही. तरीही असं म्हणतात की, त्यांचीही अस्मिता पूर्ण लोप पावलेली नसते. म्हणूनच त्यांना तहानभूक कळते, रागलोभ कळतो. पण अस्मितेची ही जाणीव अतिशय क्षीण असल्याने त्यांचं जगणं त्यांच्यासाठी अन बाकीच्यांसाठीही केवीलवाणच असतं. मात्र दुसरीकडे या अस्मितेनेच संघर्ष, दु:ख, वैताग, अशांती निर्माण होत असल्याने अस्मिता मोडीत काढण्याचे प्रयत्न होतात. अगदी आध्यात्मिक लोकसुद्धा `मी'चं विसर्जन करून अस्मिता मोडीत काढायला सांगतात. जातीअंताची लढाई, स्त्री समानतेची लढाई, धर्मविलयाचे प्रयत्न इत्यादी अस्मिता मोडीत काढण्याच्या प्रयत्नात उलट अस्मिता जपत आणि फुलवत जातात. जातीअंताची लढाई जातींच्या दृढीकरणाला चालना देते, स्त्री समानतेची लढाई स्त्री वर्चस्वाला चालना देते किंवा धर्मविलयाचे प्रयत्न धार्मिक कट्टरतेला चालना देतात. अगदी संयुक्त राष्ट्रसंघ सुद्धा याला अपवाद नाही. जगातील अस्मितांचे टोकदारपण मोडून जागतिक शांतता व सहकार्य निर्माण करण्याच्या गरजेतून त्याची स्थापना झाली. परंतु त्याने ना अस्मितेचे टोकदारपण निकालात निघाले ना जागतिक शांतता अन सहकार्य उत्पन्न झाले. उलट शहकाटशहाचा तो एक अड्डा बनला. तोंडाने अस्मिता घालवण्याची भाषा कितीही आकर्षक वाटली तरीही अस्मिता संपू शकत नाहीत कारण अस्मिता आवश्यक बाब आहे. कोणाच्या इच्छेवर वा अनिच्छेवर तिचे असणे अवलंबून नाही. अस्मिता आवश्यक आहे, ती घालवण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत अन तिच्यामुळे समस्याही निर्माण होतात असा हा तिढा आहे.

यावर काही उपाय असू शकेल का? असू शकेल. तो उपाय आहे अस्मितेचा विकास आणि उन्नयन. मी वा आम्ही अमुक जातीचे आहोत, ही भावना मोडीत काढण्याऐवजी आमची जात श्रेष्ठ, सगळ्या जगाचे, सगळ्या मानवसमूहांचे, सगळ्या जाती जमातींचे, निसर्गाचे कल्याण आणि संतुलन घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेली जात आहे. आमची जात वक्तशीरपणा, सचोटी, भ्रष्टाचारापासून दूर, तत्पर, मदतीसाठी पुढे, मागण्यापेक्षा देण्याला श्रेष्ठ मानणारी, स्वच्छ, आरोग्यपूर्ण, कामाशी प्रामाणिक अन बांधील, चालढकल न करणारी, चांगले अक्षर असणारी, ज्ञानपिपासू, गुणग्राहक, हिणकस टाकून देऊन सकस उचलून घेऊन त्याची जोपासना करणारी, नियमांचे पालन करणारी, संवेदनशील, विचारी, समजूतदार, मानवीय अन ईश्वरी गुणांची जोपासना करणारी आवश्यक तो संघर्ष करतानाही ज्याच्याशी संघर्ष करतो त्याबद्दल कटुता न पाळणारी, अन्य कोणाबद्दल हिणकसपणे न बोलणारी; अशी ओळख आम्ही निर्माण करू. हे देखील अस्मिता जोपासणेच आहे. अस्मितेची अशी जोपासना (केवळ जातीची अस्मिता नव्हे, सगळ्याच अस्मिता) ही निसर्गाच्या विरोधात न जाणारी, अस्मिता मोडून काढायला न सांगणारी अन तरीही समस्या निर्माण न करणारी ठरू शकेल. अस्मिता मोडून काढण्यासाठी खूप घाम गाळून झाला आहे. आता तिची सकारात्मक जोपासना करण्यासाठी प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, ६ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा