लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा आणि `नाम फौंडेशन' या दोन सकारात्मक गोष्टींची चर्चा सध्याच्या पार्श्वभूमीवर सुरु आहे. यातून प्रेरणा घेऊन लोकही व्यक्तिश: अन समूहश: या वा अशा कामांमध्ये सहभागी होत आहेत. ही सुखावणारीच बाब आहे. परंतु हे सारे इथेच थांबायला वा घोटाळायला नको. पाणी, दुष्काळ, शेती, शेतकरी आत्महत्या इत्यादी विषयांच्या मुळाशी जाऊन काही करण्याची गरज आहे. आजकाल सेवा करणे अथवा एखादी समस्या हाती घेऊन ती सोडवण्याचा उद्योग करणे; अन त्यातील यशाच्या प्रमाणानुसार पाठ थोपटणे किंवा थोपटून घेणे हे चालू असते. त्याची सकारात्मक बाजू ध्यानी घेऊनही एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे- मुळात समस्या निर्माण होणार नाहीत वा कमी निर्माण होतील आणि सेवेची गरजच पडणार नाही, असा समाज उभा करण्याचा प्रयत्न हवा. आज दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होते आहे.
पाणी, दुष्काळ, शेती, शेतकरी आत्महत्या इत्यादी विषयांचा संबंध जसा राजकारण, अर्थकारण, नियोजन, धोरणे आदींशी आहे; तसाच तो शहरी जीवनशैली, शहरी व ग्रामीण जीवनातील तफावत, मानसिकता, आदर्श आदींशीही आहे. मी जर म्हटले की, ज्या समस्यांसाठी `नाम फौंडेशन' काम करीत आहे त्यांचा संबंध मनोरंजन उद्योगाशीही आहे तर त्यात गैर काहीही नाही. या मुद्याला हसणारे, त्याची टर उडवणारे राहतीलच, पण त्यामुळे वास्तव बदलणार नाही. मनोरंजन उद्योग आज जी स्वप्ने लोकांना विकत आहे, जी जीवनचित्रे लोकांपुढे ठेवीत आहे; त्यातून साधे, कष्टाचे प्रामाणिकपणाचे जीवन जगण्याची प्रेरणा आणि बळ मिळू शकेल का? आम्ही गुळगुळीत, सुखासीन, सुखवस्तू जीवन जगायचे, तेच चित्र स्वप्न म्हणून विकायचे अन समस्येच्या नावाने काही दानधर्म करायचा किंवा टिपे गाळायची हे ढोंग आहे. नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे हे नक्कीच ढोंग करीत नाहीत. पण बाकी उद्योगाचे काय? क्रांती रेडकर, हेमांगी कवी, रमेश देव यांच्या भूमिका असलेल्या एका चित्रपटात हे ढोंग अतिशय परिणामकारकपणे रेखाटले आहे. पण पुढे काय? चित्रपटात ढोंग रेखाटून वा दाखवून काय होणार? रोजच्या जगण्यातून ते दूर झाले पाहिजे.
शिवाय जी जीवनशैली, जे जीवनादर्श, जे विचार आज समाजात स्थिर झाले आहेत अन पसरत आहेत; तेच या समस्यांसाठी जबाबदार आहेत. सगळ्या गोष्टींचे केंद्रीकरण, मोठ्या शहरातून लहान गावांकडे जाण्याऐवजी गावे ओस पाडून शहरांकडे घेतली जाणारी धाव, कितीही उत्पादन करा, कितीही संपत्ती निर्माण करा- एक तर त्याचा अपहार किंवा नासाडी, निरर्थक गोष्टींना देण्यात येणारी प्रतिष्ठा, निरर्थक गोष्टींना देण्यात येणारे महत्व, त्याचा समाजाच्या विविध घटकांवर होणारा व्यावहारिक, मानसिक, भावनात्मक परिणाम; याही गोष्टींचा पंचनामा आवश्यक आहे. माणसाला किती मनोरंजनाची गरज आहे, मनोरंजन म्हणजे काय, मनोरंजन आणि जीवन यांचा संबंध, आजचे चित्र या साऱ्याचाही साधकबाधक विचार हवा. गावातील मुलेमुली निरर्थक कामे करायला मुंबईसारख्या ठिकाणी येतात. त्यांना चार पैसे मिळतात म्हणून आपणही करुणार्द्र होऊन समाधानाचे उद्गार काढतो. पण असे निरर्थक काम करून चार पैसे मिळवले जातात; तेव्हा आवश्यक अन महत्वाच्या कामांना लागणारे मनुष्यबळ कमी होते हे आमच्या ध्यानातच येत नाही. दुसरीकडे तुम्ही चांगले, सुखाचे जीवन जगायचे अन आम्ही तुमच्यासाठी मातीत, शेणात, उन्हापावसात कष्ट उपसायचे का हा प्रश्नही बरोबर आहे. यातून मार्ग काय? तो कसा काढायचा? या प्रश्नांना थेट भिडावे लागेल. त्यासाठी उथळ, बिनकामाच्या, निरर्थक गोष्टींची आहुती द्यावी लागेल, किंमत चुकवावी लागेल. अनेक चुकीच्या गोष्टी, चुकीच्या आहेत हे स्पष्टपणे सांगावे लागेल. जीवनाचा, जगण्याचा ओघ, प्रवाह वळवावा लागेल, कदाचित पूर्णपणे विरुद्ध दिशेला वळवावा लागेल.
हे करताना असंख्य प्रश्न निर्माण होतील त्यांना व्यावहारिक अन सैद्धांतिक उत्तरे द्यावी लागतील. संपूर्ण जीवनदृष्टीचा फेरविचार करून नव्याने मांडणी करावी लागेल. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या संवेदनशील प्रतिभावंतांनाच याची सुरुवात करावी लागेल. हे शासनाचे काम नाही. मग शासन भाजपचे असो, कॉंग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो, रिपब्लिकन पक्षाचे असो की आणखी कोणाचे. अगदी आपल्यापैकी कोणीही किंवा नाना वा मकरंद पंतप्रधान झाले तरीही हे काम शासन, प्रशासनाचे नाही. प्रतिभावंत कलाकार, विचारवंत, लेखक, साहित्यिक यांचेच हे काम आहे. जगात आजवर त्यांनीच समाज घडवले अन बिघडवले आहेत. समस्यांच्या स्थायी उपायांसाठी सेवेच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ एप्रिल २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा