राज्य सरकारची अधिकारी असलेल्या एका मैत्रिणीला सहज बोलता बोलता विचारलं, `कुठलं फुल अधिक नाजूकपणे तोडावं लागतं?' त्यावर ती म्हणाली, `माहीत नाही. कारण मी कधीच फुले तोडलेली नाहीत आणि तोडणारही नाही. फुले तोडणं मनाला पटत नाही आणि आवडतही नाही. चुकीचं वाटतं ते.' आता यावर काय बोलणार? अशीही माणसं असतात एवढंच म्हणता येईल. इतकं हळवं वगैरे असावं का हा वादाचा विषय होऊ शकतो, पण अशीही माणसं असतात एवढं खरं. ते असो. मुद्दा आहे कोणती फुलं अधिक नाजूकपणे खुडावी लागतात? मला वाटतं अबोलीची फुलं. ज्यांनी ती खुडली असतील त्यांना अनुभव असेल. छोटीशी, नाजुकशी, त्याची दांडी, त्याच्या पाकळ्या सारंच नाजूक, शिवाय फुलं अगदी एकमेकांना बिलगलेली. कळ्या तर अगदी एकत्रच, जणू एकाच कळीतून अनेक फुले फुलतात. एक फुल खुडताना दुसऱ्याची पाकळी कशी हातात येईल सांगता येत नाही. एखादे वेळी पाकळ्या हाती येतील आणि दांडी राहून जाईल.
फुलं खुडण्याचं पण एखादं शास्त्र असावं. जास्वंदाचं फुल योग्य ठिकाणी खुडलं तर पटकन हाती येतं नाही तर त्या दांडीशी झुंज द्यावी लागते. मोगऱ्यासारखं नाजूक फुलं पण कधीकधी हट्टीपणा करतं आणि हाती यायला नकार देतं. तगर, झेंडू, कण्हेर ही बिचारी फुलं. फार खळखळ करत नाहीत. तोडायला, ठेवायला, गुंफायला सोपी. कुंदाची टपोरी फुलं वेचता येतात किंवा खुडताही येतात. काही मात्र फक्त वेचायची. प्राजक्त, चाफा, बकुळ ही त्यातली. मधुमालती, रातराणी वगैरे ना खुडायची ना वेचायची. ती फक्त फुलणार, सुगंध पसरवणार आपण तो भरून घ्यायचा बस. चमेली वगैरे खास पोरीबाळींची, महिलांची जहागिरी. गुलाब तोडताना नाजुकपणा नको असला, तरी काळजी मात्र घ्यावीच लागते. राजा ना तो. मग आदब नाही राखली तर काटा टोचणारच. जाणीव करून देणार आपण राजा असल्याची.
फुले तोडण्याचेही प्रकार, पद्धती, प्रसंग, आठवणी असतात. सकाळी सकाळी फुलांचा शोध घेत निघालेली बायामाणसे असतात. झाडे वाकवायची, फांदी तुटली तरी चालेल; मिळतील ती आणि तेवढी फुले तोडायची. एखाद्या पिशवीत किंवा आणखी कशात ती कोंबायची आणि कोणाच्या लक्षात येऊ नये असे पाहत मार्गाला लागायचं. म्हातारे कोतारे आपल्या काठीने फांद्या वाकवित असतात. कधीतरी पाठ केलेली एक ओळ अशा वेळी आठवते. देव भक्ताला म्हणतो, `नको कळ्या तोडू, मला त्रास होतो... नको हार गुंफू, मला भार होतो...' पण फांद्या वाकवाकवून फुले तोडणाऱ्यांना त्यांच्या देवाने कधी असे म्हटले नसेल. याच संदर्भात माळ्याने सांगितलेला एक किस्साही नमुना म्हणावा असाच होता. तो कामाला जात असलेल्या एका घरी, दोघेच म्हातारा म्हातारी राहत असत. म्हतारबुवा खडूस होते. कुंदाचं मोठ्ठ झाड होतं त्यांच्याकडे. पण कोणाला हात लावू देत नसत. मागितले तरी देत नसत. आठवड्यातून एकदा माळीबुवा गेले की त्यांना कुंदाच्या शेकडो फुलांचा सडा झाडून काढावा लागत असे.
श्रावण, भाद्रपद हे सणावाराचे महिने. शिवाय दसरा, दिवाळीचे दिवस; पहाटेच्या अंधारातच सगळी फुले कधी गायब होतात काही कळत नाही. ज्याची झाडे असतात तो बिचारा फ़ुलपुडी विकत घेऊन येतो. फुलांचा व्यवसाय करणाऱ्यांना झाडे विकत देखील दिली जातात. मग त्यावर अधिकार त्या फुलवाल्याचा. पण सगळ्या गोष्टींचा संबंध पैशाशी न जोडणारे लोकही असतात. मातोश्री त्यापैकीच एक. घरी कुंदाची खूप सारी फुले निघत असत. ते पाहून तिने संकल्प केला, देवांना लक्ष वाहायचा आणि मग कुंदाची फुले तोडणे आणि मोजून ठेवणे हा घरातल्या सगळ्यांचा महत्त्वाचा कार्यक्रम झाला. तिने आपला लक्ष पूर्ण केला. एक निखळ आनंद काय असतो ते अनुभवायला मिळालं.
रा. स्व. संघाची आमच्या वेटाळातील शाखा अतिशय जोमदार होती. शंभर- शंभर उपस्थिती रोज राहत असे. शाखेचा गुरुदक्षिणा उत्सव म्हणजे तर उत्साह आणि धमाल. दक्षिणेपेक्षा उपस्थिती जास्त राहत असे, पण उत्साह, आयोजन, नियोजन, व्यवस्था, वक्तशीरपणा, टापटीप वगैरे अगदी वाखाणण्याजोगे. त्या एका कार्यक्रमासाठी महिनाभराची धावपळ राहत असे. आठवडाभर आधी प्रत्यक्ष व्यवस्थेच्या कामाचे वाटप होत असे. त्यात फुले गोळा करण्यासाठी एक गट राहत असे. हा गट पहाटे उठून सगळ्या वस्तीतील फुले तोडत असे. मग ती फुले एखाद्याच्या घरी नेउन दिली जात. त्या घरच्या मुली मग छान तीन हार करून देत असत. एक गुरु म्हणून ज्याचे पूजन करायचे त्या भगव्या ध्वजासाठी, अन दोन हार डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांसाठी. या सगळ्या आठवणी फुले तोडण्याशी अविच्छिन्नपणे जुळलेल्या आहेत.
फुले तोडायची म्हणजे तोडायची, त्यात काय असते एवढे; असे वाटणारेही असतात. पण फुले तोडणे म्हणजे काही विशेष आहे असे वाटणारेही असतात. फुले तोडताना; त्या फुलाशी, झाडाशी बोलत बोलत, गुज करीत फुले तोडायची असतात. ती विशिष्ट पद्धतीने एक एक करून तोडायची असतात आणि नीट प्रेमाने आदराने टोपलीत ठेवायची असतात, असे वाटणारेही असतात. त्यामुळेच एकदा घरकाम करणाऱ्या बाईला म्हटलं होतं, तुम्ही फुलं नका तोडत जाऊ. ते माझं काम आहे. मीच करीन. त्या बाई बोलल्या काही नाहीत, पण त्यांना नक्कीच वाटलं होतं की, मी यांचं काम कमी करून देते आणि हे नको म्हणतात. पण त्यांना मी काय समजावून सांगणार होतो?
फुले तोडून काय मिळतं? रक्तदाब वगैरे नियंत्रणात राहत असावा. मागे रक्तदाब वाढलेल्या एका मित्राला मी असंच काहीतरी ठोकून दिलं होतं. पण असे काही फायदे होत असावेत किंवा नसावेत. मिळणारा आनंद काय कमी असतो? अशी ही फुले तोडण्याची कहाणी.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार ८ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा