सोमवार, २५ एप्रिल, २०२२

बौद्धिक संपदा आणि भारतीयता

आज जागतिक बौद्धिक संपदा दिवस (intellectual property rights day) आहे. त्यानिमित्ताने पेटंट, स्वामित्व, ट्रेडमार्क इत्यादी बौद्धिक संपदा पैलूंचा विचार होईल. या सगळ्याचा उहापोह होईल. कोण किती मागे वा पुढे आहे, आपण काय करण्याची गरज आहे; आदी विषयांची चर्चा पण होईल. संबंधित कायदे, नियम, संकेत, तरतुदी हे विषयही चर्चेत येतील. परंतु दूरगामी दृष्टी आणि भविष्य या संदर्भात महत्वाचा असलेला एक विषय मात्र चर्चेत येणार नाही. त्याचीही नोंद घ्यायला हवी. तो मुद्दा म्हणजे, बौद्धिक संपदा अधिकार ही गोष्टच अयोग्य आहे. 'आज'ची गरज म्हणून त्याचा पुरेसा विचार करतानाच, त्यातून बाहेर पडण्याचे धोरण- पद्धत- तत्वज्ञान- यांचाही विचार व्हायला हवा.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे 'चौकीदारी' ही बाब चर्चेत आली आहे. स्वतः मोदी यांनीही त्याचे विश्लेषण केले आहे. सध्या एक राजकीय घोषणा आणि भ्रष्टाचारावर अंकुश एवढे त्याचे स्वरूप मर्यादित असले तरी, 'चौकीदारी'चा व्यापक जीवनार्थ सार्वजनिक चर्चेत आणणे/ येणे आवश्यक आहे. ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र याच 'चौकीदारी'चा, विश्वस्त कल्पनेचा विचार मांडतो. गांधीजींच्या चिंतनाचाही तो केंद्रबिंदू होता. गांधीजी तर म्हणत असत की, जगातील सारेचे सारे साहित्य नष्ट झाले आणि एवढा एक मंत्र उरला तरी मानवजातीला आशा आहे.

भारतीय चिंतनाचा हा गाभा आहे. म्हणूनच बौद्धिक संपदा अधिकार ही कल्पनाच भारतीय आत्म्याशी मेळ न खाणारी आहे. जगाच्या एकूण व्यवहाराच्या संदर्भातही ही कल्पना त्रासदायक आहे. स्वार्थ, सत्ता, स्वामित्व, संपत्ती हेच भारतेतर विचारांचे विषय प्रामुख्याने राहिले आहेत. त्यापोटीच आणि त्यासाठीच अनेक कल्पना आणि व्यवस्था जन्माला घालण्यात आल्या. बौद्धिक संपदा अधिकार ही सुद्धा त्याच पठडीतील कल्पना आणि व्यवस्था. भारतीय विचारांची केंद्रवर्ती कल्पना मात्र स्वार्थ, सत्ता, स्वामित्व, संपत्ती ही नसून, 'सर्वेपि सुखीन: सन्तु' ही आहे. त्यामुळे सर्व प्रकारची मानवीय संपदा आणि मानवीय उद्यम ही सगळ्या जगासाठी आहे, हीच भारतीय भावना आहे आणि असू शकते. आजची परिस्थिती या भारतीय भावनेसाठी अजिबात पोषक नाही. परंतु याचा अर्थ ती चुकीची आहे असा होत नाही आणि अयोग्य गोष्ट सुरूच राहावी असाही त्याचा अर्थ काढता येत नाही. आहे त्याच स्थितीतून मानवतेची नौका योग्य धारेला लावणे ही सुज्ञांची जबाबदारी आहे.

जगाचा वर्तमान प्रवाह बदलण्यासाठी प्रथम एका सशक्त तत्वज्ञानाची गरज आहे. ईशावास्य उपनिषदाचा प्रथम मंत्र आणि असंख्य अधिकारी व्यक्तींनी त्यावर केलेले भाष्य, त्याचा लावलेला आणि सांगितलेला अन्वयार्थ; यांचा व्यापक प्रचार प्रसार, चर्चा, खंडन मंडन होत राहायला हवे. यातूनच एक सशक्त तत्वज्ञान आकार घेईल. तत्वज्ञान हा शब्द, ही कल्पना आणि त्याचा भाव याबद्दल आज असलेली नकारात्मक भावना टाकून द्यावी लागेल. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं एक पुस्तक आहे, 'स्वरमयी'. या पुस्तकाच्या पहिल्याच पृष्ठावर त्यांनी एक वाक्य दिलेले आहे. कोणाचे आहे लक्षात नाही पण वाक्य असे आहे - 'जो समाज तत्वज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाला अधिक महत्व देतो त्या समाजाला कालांतराने दोन्हीची गरज उरत नाही.' केवळ कौशल्य, तंत्र, कायदे, व्यवहार एवढ्याने भागणार नाही; तर एक सशक्त तत्वज्ञान हीसुद्धा मानवतेची गरज आहे. बौद्धिक संपदा या विषयाच्या संदर्भातही ते खरे आहे.

शेवटी श्री रामकृष्ण परमहंस यांचा एक प्रसंग सांगून समारोप करतो. एकदा कोलकात्याचे एक प्राध्यापक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. माणूस, त्याचे प्रयत्न, त्याचे जीवन यात ईश्वर नावाच्या गोष्टीला काय स्थान, असाच चर्चेचा रोख होता. सगळे प्रश्न, तर्क वगैरे ऐकून श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले - केवढी तुमची बुद्धी, किती तुमचे ज्ञान. बरं मला सांगा हे सगळं तुमच्याकडे आलं कुठून? तुम्ही म्हणता तुमची बुद्धी, ही तुमची बुद्धी तुम्हाला मिळाली कशी, दिली कोणी? 'चौकीदारी', विश्वस्त भावना यांचं मूळ इथे आहे. आपण जे जे आपलं म्हणून म्हणतो ते ते आलं कुठून? त्याचा मूळ मालक कोण? ही पृथ्वी, त्यावरील साधनसंपत्ती; एवढंच नाही तर आपलं शरीर- मन- बुद्धी- गुण- वारसा- शक्ती- ठेवी- सगळं सगळं आपल्याजवळ आलं कुठून? त्याच्या अगदी मुळाशी जाऊन त्याचा खराखुरा मालक कोण, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय 'सर्वेपि सुखीन: सन्तु' याकडे जाणे शक्य होणे नाही. एका सशक्त जीवन तत्वज्ञानाच्या पायाभरणीसाठी हे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २६ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा