आमच्या वस्तीत गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून एक वैशिष्ट्यपूर्ण विक्रेता येतो. अकोल्याच्या गांधी ग्रामची गुळपट्टी विकायला. एक मोठीशी व्हॅन. त्यात शेंगदाणे, खोबरं आणि तीळ यांच्या गुळपट्ट्या. त्या मोजून द्यायला एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा. त्यासाठी एक मुलगा. अन गाडी चालवणारा मालक. बस एवढ्या गुळपट्ट्या शिवाय दुसरा माल नाही. विक्री चांगली होत असणार. त्यामुळेच अजून व्यवसाय सुरू आहे अन तोही चांगल्या मोठ्या व्हॅनमधून. गरजेची एखादीच साधी वस्तू दर्जा राखून विकल्यास सुद्धा व्यवसाय चालू शकतो ही एक लक्षणीय बाब. पण या सगळ्यापेक्षा त्याची नोंद घेतली पाहिजे त्याच्या जाहिरातीसाठी. त्याची गाडी येताच कानावर पडते - 'वक्रतुंड महाकाय...' त्यानंतर मालाची माहिती, माल तयार करणाऱ्या संस्थेची माहिती, माल आणि संस्था यांना प्राप्त झालेला गौरव, प्राप्त झालेली नावाजलेल्या लोकांची वाखाणणी, काही अभंग अन भक्तिगीते. अर्थात हे सारेच ध्वनिमुद्रित असते. आजूबाजूला ऐकू जाईल इतक्या आवाजात छोट्या ध्वनिक्षेपकावर हे चालू असते. माणूस कामात असला तरी त्याला व्यवधान होणार नाही इतकाच आवाज. व्यवधान होणार नाही अशीच भाषा अन मांडणी. अगदी वेचक अन वेधक. लक्ष खेचून घेणारी अन तरीही त्रासदायक नसलेली. शिवाय सभ्य, सुसंस्कृत, सात्विक. मुद्दाम (स्वतःला आवडत आणि पटत नसतानाही) आजच्या वातावरणासाठी हे नमूद केले पाहिजे की, तो विक्रेता ब्राम्हण नाही. नाही तर ब्राम्हणी वगैरे शेलके शब्द वापरायचे आणि मूळ विषयाला बगल द्यायची अशी आजकालची पद्धत. त्यासाठी हा विशेष उल्लेख. व्यवसाय करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी उथळपणा, बटबटीतपणा, कर्कश्शपणा, गोंधळ करण्याची गरज असतेच असं नाही. ही जाण समाजव्यापी झाली तर किती छान होईल नं.
- श्रीपाद कोठे
४ एप्रिल २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा